Tuesday, November 29, 2016

           डॉ. श्रीराम लागू यांना रंगभूमीवर काम करताना पाहणं हा एक अपूर्व आनंद होता. १९५७ पासून ते त्यांनी रंगभूमीवरून निवृत्त होईपर्यंत हा आनंद मी मनसोक्त लुटला. 'वेड्याचं घर उन्हात' पाहिल्यापासून आमची विशेष दोस्ती झाली. व्यक्तिश: तो श्रीराम तरी रंगभूमीवर त्या त्या भूमिकेतील व्यक्तीच वाटायचा. पुढील पिढीसाठी 'नटसम्राट', 'सूर्य पाहिलेला माणूस' आणि 'हिमालयाची सावली' या नाटकांच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. 
          डॉ.लागू यांच्या 'लमाण' आणि 'रूपवेध' या पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली. श्रीरामचे नाटकाइतकेच म्हणायला हरकत नाही कवितेवरही नितांत प्रेम. 'रूपवेध' या संस्थेच्या वतीने पूर्वी त्याने कवितावाचनाचे कार्यक्रमही केले होते. ती आठवण ठेऊन त्यांच्या कवितावाचनाचे ध्वनिमुद्रण करावे असे मला वाटत होते. अशाच प्रेरणेने रेणुका माडीवाले हिने कुसुमाग्रजांच्या 'प्रवासी पक्षी' मधील मोजक्या कवितांचे ध्वनिमुद्रण केले आहे. ती ध्वनिफीत पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनेच प्रसिद्ध व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्याने हे ई-पुस्तक 'कवितेच्या पलीकडले' या नावाने 'प्रवासी पक्षी'च्या विशेष आवृत्तीसह प्रसिद्ध होणार आहे. दरवर्षी ९ डिसेंबरला 'तन्वीर सन्मान'चा कार्यक्रम पुण्यात होत असतो. या संधीला डॉ.लागू आणि कुसुमाग्रज यांच्या चाहत्यांसाठी ही विशेष पर्वणी.

Monday, November 21, 2016

मुंबईत ऑपेरा हाऊस समोरील देवधर मास्तरांचे संगीत विद्यालय हे एक महत्त्वाचे केंद्र. संगीताचे क्षिक्षण सर्वसामान्यांना देण्याचे काम सातत्याने गेली अनेक दशके येथे होत आले आहे. कुमार गंधर्व हे त्या संस्थेतूनच तयार झाले इतके सांगितले म्हणजे त्या संस्थेचे महत्त्व लक्षात येईल. जवळजवळ सात दशकांपूर्वी मी शाळकरी असताना अनेकदा कुमारजींचे तेव्हाचे तडफदार गायन मी ऐकले आहे . देवधर मास्तरही गात, पण त्यांचे लक्ष शिक्षण, लेखन अशा गोष्टींकडे अधिक असायचे. 
          'संगीत कला विहार'चे संपादन अनेक वर्षे बी.आर. देवधर यांनी केले. या काळात त्यांनी केलेले लेखन 'थोर संगीतकार' या पुस्तकात गांधर्व महाविद्यालयाने प्रसिद्ध केले. त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण आणि त्याच्या असंग्रहित लेखांचे प्रकाशन 'थोर संगीतकारांची परंपरा' या नावाने आमच्या पॉप्युलर प्रकाशनाला मराठीत आणि इंग्रजीतून प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली. भातखंडे आणि पलुस्कर दोन्हीही संगीत महर्षींशी प्रकाशक म्हणून माझा संबंध आला. 

Wednesday, November 2, 2016

          मी पार जुन्या पिढीतला. मराठी प्रकाशक म्हणूनही माझ्या कामाला ६४ वर्षे झाली. म्हणजे मी जणू दुसऱ्या ग्रहावरून आलेला पाहुणा. तुमचे ब्लॉग, ट्विटर, फेसबुक, वेबसाईट हे शब्द मला नवखे आहेत. पण तरीही मला तुमची दोस्ती हवी आहे.
           पॉप्युलर प्रकाशनाच्या निर्णयप्रक्रियेतून जरी मी मुक्त झालो असलो तरी पुस्तके हे माझे पहिले प्रेमप्रकरण, प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून आणि वाचक म्हणूनही. त्यात संगीत हाही माझा आवडीचा विषय. तेव्हा आज आपण एका संगीत विषयक पुस्तकाबद्दल बोलूया.
          पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला 'हिंदुस्थानी संगीत पद्धती' हा तब्बल दोन हजार पृष्ठांचा ग्रंथ. यात हिंदुस्थानी संगीताच्या इतिहासापासून शास्त्र आणि अनेक लहानमोठया मुद्द्यांसंबंधी तपशिलात चर्चा आहे. तीही प्रश्नोत्तर स्वरूपात. गेल्या शंभर वर्षात यात फारशी भर कोणी घालू शकले नाही. हे ग्रंथ तुम्ही वाचलेच पाहिजे असे मला वाटते. त्यासाठी पाहा.
http://www.popularprakashan.com/Marathi/Hindusthani-Sangeet-Paddhati